Monday, January 16, 2006

अंधारातील वाट

सूर्य बुडलेला अंधार दाटलेला..
काळोखाच्या खोलाईत आत बघत राहिलो
न दिसणाऱ्या मुक्कामाची वाट शोधत राहिलो.
ठेचकाळत अडखळत चालत राहिलो

फसवे तारे फसव्या दिशा माझी वाट चुकवत होत्या
चकव्याला माझ्या मागे लागण्यासाठी खुणावत होत्या.
का होतय हे ? मीच का छळला जावू
धूळ दगडधॊंड्यातून मीच का मळला जावू
माझ्यासाठी कधीच कोणी उजेड दाखवणार नाही का ?

मग उलगडा झाला सगळा..
कोणीतरी बोललं मनात नीट ऐकू येइल असं
अरे तुझी वाट तूच शोधायचीस
नसलीच पायवाट तर नवी बनवायचीस
तुझे डोळे आणि कान उघडे ठेव
उजेड आपोआप दिसत राहिल
स्वत:वरच्या विश्वासाने वाट सोपी बनेल

तुझा तूच जात रहा .

- १६ जानेवारी २००६

Tuesday, January 10, 2006

भाग्यविधाता

भाग्यविधाता हा खरंतर फ़ार मोठा शब्द. त्याचा अर्थ जो आपलं सर्वसामान्य लोकांच भाग्य आणि अस्तित्व ठरवतो आणि त्याच्या मर्जीनुसार आपला खेळ चालतो तो.
बहुतेक वेळा त्याला 'देव' असं म्हणलं जातं. क्वचित कधीतरी शताकानुशतकांतुन एखादा माणूस हे विशेषण धारण करण्याजोगा जन्मतो.
पण आजकाल गल्लोगल्ली असे नवे भाग्यविधाते जन्मले आहेत. त्यांचे फोटो, ज्यात ते अगदी कष्टानं हसत असतात आणि त्यांचे भाट (ज्यांचं भाग्य ह्या 'भाग्यविधात्या' च्या दावणीला बांधलेलं असतं) आपली नावं आणि फोटोंच्या रांगेसह त्याच्या चरणाशी रुजू असतात. त्या फलकावर लिहीलेलं पण असतं की लोकप्रिय नेते आणि आमचे भाग्यविधाते श्री. XXX ह्यांना वाढदिवसाबद्दल हार्दिक शुभेच्छा !
आम्हा पामरांना तेव्हा कुठे साक्षात्कार होतो कि हा कोणीतरी नवा भाग्यविधाता आहे बरं !

ह्यांच्या येण्याने कोणती यमुना दुभंगली ?
कोणत्या शिवधनुष्याची प्रत्यंचा मोडली ?
हे कोणासाठी क्रूसवर चढणार आहेत ?
ह्यांच्या वागणुकिने समाजाला सद्वर्तनाची आणि विवेकाची दिशा मिळणार आहे का ?


ह्या प्रश्नांची उत्तरं कधीच मिळणार नाहित आणि विचारायला जाणाऱ्याचं 'भाग्य' पुन्हा 'ह्यांच्याच' हाती !
तेव्हा आपल्या आसपास असा कोणी भाग्यविधाता असल्यास तेच सत्य माना.
यापेक्षा फार काही करण्याची कुवत आपल्यात नाही, निदान ज्यांच्यात होती ते आता जन्म घेत नसावेत.

Tuesday, January 03, 2006

भाषा

आजकाल भाषा हा विषय कोणाच्याच जिव्हाळ्याचा राहिलेला नाही. भाषा मग ती बोली असो की लेखी शक्य तितकी ढिसाळ वापरण्याकडे वाढता कल दिसतो. नाही मी साहित्यिक किंवा भाषा शास्त्रज्ञ नाहिये पण भाषेवर अतिशय प्रेम असलेला माणूस आहे. अलंकारीक लिहीणं किंवा बोलणं वेगळं पण नुसतं साधं बोलतांना किंवा लिहीतांना योग्य आणि शुद्ध भाषा वापरणं महत्वाचं आहे. शब्दसंग्रह खूप नसला तरी चालेल पण तो अयोग्य आणि धेडगुजरी नको. दुसऱ्या भाषेचा द्वेष न करता आपली भाषा जपणं महत्वाचं.

Monday, January 02, 2006

नव्या वर्षाचे काही संकल्प

१. केलेले संकल्प पाळायचा प्रयत्न करणे.
२. पाळता येण्याजोगेच संकल्प करणे.
३. रहदारीचे नियम शक्यतो पाळणे.
४. चांगले वागणे
५.चांगले बोलणे
६. आपले काम नीट आणि चोख करणे.

पहिली भेट

आज मी नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी लिहायला सुरुवात केली आहे. इथून पुढे चालू ठेवावं अशी इच्छा आहे.