Friday, June 16, 2006

नि:शब्द

सध्या संध्याकाळी/रात्री मला जशी सवड मिळेल तसा आणि जमेल तेव्हा कधीकधी मी पर्वतीवर जातोय. वर चढल्यावर मागे चालत जावून एक कट्टा आहे त्यावर बसतो. बहुतेक वेळेला एकटा नाहितर मित्र बरोबर असतो. त्या कट्ट्यावर बसून मी शांतपणे समोर दिसणारं पुणं,त्यातल्या ओळखीच्या इमारती,भाग आणि अगणित लुकलुकणारे रंगीत दिवे बघतो. मनात चाललेला विचारांचा, भावनांचा कोलाहल ते सर्व पाहत असतांना आधी आधी डोकं वर काढायचा, माणूस एकटा असला की हे असं आपोआपच होत असावं बहुधा; आपल्याला मनात सलणारे विषय, असणाऱ्या चिंता,भविष्याचा वेध , सभोवताली असलेले अनेक प्रश्न आणि त्याची कुठेही दृष्टीपथात न दिसणारी अगम्य उत्तरं,
‘तत: किम ?’ (पुढे काय) हा तर आपणा समस्त मानवजातीला पडलेला प्रश्न,
आणि ही वाट ज्यानी सोपी करावी अशी आपणा माणसांची अपेक्षा असते ‘त्या’ च्याशी माझा चालू असलेला काहिसा जुजबीच संवाद म्हटलं तर अबोलाच ; तर सांगायचा मुद्दा हा की असं सगळं डोकं वर काढायचं. मग समोर पसरलेलं पुणं बघितलं की हळूहळू सगळं शांत होवू लागायचं त्यातल्या हजारो लाखो लोकांची वर्दळ जगण्याची धडपड असा विचार सुरु झाला मग त्यांना पडलेले प्रश्न आणि अडचणी आणि त्यांच असलेलं वेगळं आणि प्रसंगी विराट स्वरुप ह्यांचापण विचार डोक्यात येवू लागला. इतकं सगळं असतांना मी माझेच विचार का कुरवाळत बसलोय इतर अनेकांच्यापेक्षा मी खरंच खूप सुखी आहे आणि समाधानीसुद्धा ह्याचं भान मला आपोआप आलं. माझ्या आतमधल्या मूळच्याच ऑप्टिमिझम (आशावाद) ला बळकटी येत असल्याचं जाणवलं आणि माझ्याशी एक शब्दही न बोलता मलाच स्वत:शी बोलायला लावून ‘त्या’ ने माझ्या अबोल्यातली हवा काढून घेतल्याचंसुद्धा एक आदरमिश्रित कौतुक वाटलं. बहुधा ह्यालाच ‘ध्यान’ म्हणत असावेत. आताशा मी त्या कट्ट्यावर नि:शब्दच बसतो.

5 Comments:

Blogger Shailesh S. Khandekar said...

आदित्य,

अतिशय सुंदर लेख. मोजक्याच शब्दात गहन विचार मांडलेले आहेत. छानच!

6:22 AM  
Blogger मुक्या.. said...

आदित्य,
यालाच कदाचित विदेहवाद असेही म्हणतात. कधी कधी आपण आपल्यालाच आपल्या देहाबाहेर येऊन बघत असतो. तुम्ही खरंच नशीबवान आहात कारण खूप कमी लोक विदेहवाद अनुभवतात...आणखी एक ही ध्यानाची पहिली पायरी आहे.. :)
शुभेच्छा !!

6:51 AM  
Blogger Sumedha said...

आदित्य,

खूपच सुंदर लिहीलं आहे. अगदी पटलं. माझ्या मते प्रत्येकाला असं एक स्थान असावं एकांतात अंर्तमुख करणारं...

9:22 AM  
Blogger Akira said...

Chaan lihila aahes....

Aajkaalchya dhaka-dhakichya jeevanaat ase manashanti milwayche marga/thikana sapadli ki manachi margal jhatakna soppa jata :)

8:24 PM  
Blogger Sonali said...

खरचं ही ध्यानाची पहिली पायरी आहे. छान लिहिलं आहे. मला वाटतं अशा परिक्षणाने स्वत:कडे बघण्याचा द्रुष्टीकोन बदलत असावा, तो अधिक प्रगल्भ आणि स्वतंत्र होत असावा.

12:22 AM  

Post a Comment

<< Home