Saturday, November 30, 2019

निर्ढावलेला देश

लैंगिक विषयांचा उभा केलेला प्रचंड बागुलबुवा,
एकंदरीत ह्या सगळ्या विषयांच्याबाबत कुटुंबात आणि समाजात असलेली कमालीची दांभिकता,
त्यातून पिढ्यानपिढ्या आलेला ठार अडाणीपणा (सर्व धर्म ह्यात अगदी सारखेच) आणि स्त्री ही केवळ एक उपभोग्य आणि कसलीही किंमत नसलेली वस्तू आहे हा अनेकांचा ठाम समज आपल्याला 'जनावर' बनवून दुर्दैवानं अनेक 'निर्भया' बघण्याची अत्यंत लाजिरवाणी वेळ आणतो आहे.
मुलगा झाला म्हणजे दैवी देणगी मिळाली आणि त्याला कसेही वागला तरी पोटाशी घेऊन सोडून द्याची वृत्ती निर्माण झाली तेव्हाच आपली अधोगती निश्चित झाली.
आपण शिकलेले असो वा अडाणी, बायका आणि मुलींशी सभ्यतेने, सन्मानाने कायम आणि कोणत्याही वेळी कसे वागावे हे मुलांना शिकवण्याची वेळ अजूनही गेलेली नाही.
कामाच्या ठिकाणी, शाळा कॉलेज मध्ये लोचट वागून बोलून अनेक लोक मनातली घाण दाखवतात जोवर असेही लोक आहेत तोपर्यंत आपल्याला उज्वल भविष्य नाही.
जी डी पी १०% न्या, चंद्रावर जा कि प्रत्येकाला लखपती बनवा; लोकांच्या मनाच्या उकिरड्याची स्वच्छता होणे नाही.
आयसिस सारख्या अतिशय हीन दर्जाच्या स्त्री गुलामगिरीवाल्या विचारसरणीकडे वाटचाल लखलाभ.
आदित्य सायगांवकर ३० नोव्हेंबर २०१९

Tuesday, January 05, 2016

मी एक ढोंगी …

मी एक ढोंगी …
जगामध्ये कुठेही अतिरेकी हल्ला झाला कि त्या देशाच्या झेंड्याने माझा डी . पी . रंगे
'जे सुइस चार्ली' वगैरे अगम्य वाक्यांनी मी दाखवी की मी त्यांच्या संगे
माझ्या बकवास वाहिनीवर वर पोकळ बुद्धीवन्तासंगे बाष्कळ चर्चेचे गुऱ्हाळ रंगे
हा वाईट, तो वाईट… च्छे… ह्या जगात सगळ वाईट
आज माझ्या देशावर हल्ला झाला…
कित्येक शूर निधडे मोहरे जाया झाले.
माझा डी . पी . बोडकाच आहे.
मला काहीच पडलेले नाही.
मी आता सरकार आणि गुप्तहेर कसे वाईट ह्यावर,
माझ्या रिकामटेकड्या भोजनभाऊ बुद्धीवन्तासंगे गंभीरपणे धोरणात्मक बाष्कळ चर्चा करतो आहे
मला कस सगळ आधीच माहित होत हे सांगतो आहे.
अचानक मला मी 'लोकमान्य' असल्याचा भास होऊ लागला आहे.
त्यामुळे मी 'सरकारचे डोके …' वगैरे सारखे तीक्ष्ण प्रश्न विचारतो आहे.
मग आहे काय बिशाद मला नाही देणार जवाब ?
माझा तिरंगा….
माझी लायकी ओळखून आहे
म्हणूनच माझ्या देशातल्या शूर वीर शहिदांना 'त्याचे' कफ़न मिळते आहे
आणि मी…
माझ्याच देशाच्या शत्रू साठी देशाविरुद्ध जळतो आहे.
- आदित्य
५ जानेवारी २०१६

Tuesday, March 06, 2007

नॉस्टॅल्जिया (स्मरण-रमण)

आपण लहान असतो तेव्हा कधी एकदा मोठं होवू असं वाटत असतं.

प्रत्येकाची कारणं वेगवेगळी असतात;

उदा. अभ्यास करावा लागत नाही , मोठयांना कोणी प्रश्न विचारत नाही इथपासून ते अगदी काहिही कारणं असतात.

पण मोठे मात्र बरेचदा नॉस्टेल्जिक होतांना दिसतात. कायम बालपण,तारुण्य त्या वयात केलेली मजा, आलेले अनुभव, शाळा / कॉलेज मधले दिवस ह्या स्मरणयात्रेत रमतात. काय कारण असेल ह्या विरोधाभासाचं ?

कारण नेमक सांगता येइल का ते माहित नाही.

लहानपणी आपलं विश्व तस चाकोरीबद्ध असतं एक ठराविक चार पाच गोष्टींमध्येच आपण गुंतलेलो असतो.
त्या जागेवरुन मोठ्यांच्या जगाबद्द्ल एक कौतुकमिश्रित कुतुहल असतं . त्यातल्या गमती,मजा अधिकार दिसत /जाणवत असतो पण त्यामागचे कष्ट , स्वाभिमानाला ठेच देणारे प्रसंग, हितशत्रूंचे परतवलेले हल्ले, अनुभव हे आपल्याला तेव्हा जाणवत नाही. जस जसे मोठे होत जातो तसे हे सगळे आपल्या विश्वाच्या परिघात सामिल होवू लागतात आणि बाल्य (इनोसंस) लोप पावू लागतं. तेव्हाच कधीतरी आपल्याला आपल्या बालपण / तरुणपणातले दिवस दिसतात .
तेव्हा हे काहिच नव्हतं त्यामुळे ते दिवस अजुनच सोनेरी वाटतात आणि आपण नॉस्टॅल्जिक होतो.
कितीही वाटलं तरी ते दिवस पुन्हा येणार नाहीत ह्या कल्पनेनी अजूनच वाईट वाटतं.

‘तुमच्यातले बाल्य कायम जपून ठेवा’ असं जेव्हा थोरमोठे म्हणतात तेव्हा त्याचा अर्थ हाच असावा की तुम्ही जितकं बाल्य जपाल तेवढा तुमचा नॉस्टॅल्जिया समतोल राहिल कारण हे स्मरण-रमण कितीही छान असलं तरी कधीही परत न येणारं आहे तेव्हा ‘मोठं’ होण्याचं सत्य स्विकारुन पुढेच जायलाच हवं

Sunday, December 31, 2006

मागे वळून पाहतांना...

प्रिय मित्र-मैत्रिणींनो सर्वात आधी २००७ च्या तुम्हा सर्वांना अनेकानेक शुभेच्छा!
येणारे वर्ष सुखासमाधानाचे जावो हिच सदिच्छा.

बरोब्बर एक वर्षापूर्वी मी 'गप्पाष्टक' लिहायला सुरुवात केली आणि गेलं वर्षभर ब-यापैकी लिहिता आलं ह्याचं समाधान वाटतंय. तुम्हा सर्वांकडून मिळालेल्या प्रतिक्रिया आणि सूचना मला सतत स्फूर्तीदायी ठरल्या आणि वाटचाल सुखद चालू राहिली त्याबद्द्ल धन्यवाद.

२००६ हे वर्ष तसं फारच घडामोडीयुक्त होतं. ह्या वर्षाने आपल्याला खूप काही दाखवलं. आर्थिक भरभराटी बरोबरच भ्याड आणि क्रूर बॉम्बस्फोट,अतिरेकी कारवाया हे सुद्धा भरपूर मिळालं. पण तरिही माणूस आशावादी असतो येणा-या प्रत्येक वर्षाकडून भरभरुन पदरी पडावं अशी इच्छा बाळगून असतो.

माझ्याबाबतीत बोलायचं झालं तर २००६ ह्या वर्षानी माझं संपूर्ण आयुष्य बदलून टाकलं आहे. चाचपडत वाट शोधणारा मी आता जरा स्थिरावलो आहे. मला ह्या वर्षाने अनेक प्रकारची माणसं ह्या ना त्या कारणाने भेटवली त्यातल्या अनुभवाने खूप काही दिलं शब्दात न मांडता येण्याजोगं पण मनात रुजलेलं. आता लवकरच मी साधनाबरोबर 'चतुर्भुज' होणार आहे! हो अगदी २००७ च्या सुरुवातीलाच, तेव्हा मागे वळून पाहतांना २००६ मधे मी एकटाच वाटचाल करत होतो २००७ पासून 'सोबत' असणार आहे तेव्हा एक वेगळीच उत्कंठा आहे नव्या प्रवासाची. लिहायचं खूप आहे पण शब्द कमी आहेत. 'गप्पाष्टकातून' भेटत राहूच. लोभ आहेच तो वाढत रहावा हि विनंती.

Monday, August 28, 2006

नशीबाचं 'नशीब' !!

एकदा नशीब भेटलं होतं वाटेत नाक्यावर…

मी म्हणालो …
” का रे बाबा तू सदानकदा रुसलेला
लोक इतकी वाट पाहतात तरी नाक्यावरतीच बसलेला.
असं करु नकोस
साध्यासुध्या लोकांना
असं वेठीला धरु नकोस
‘बोल’ लावल्यावर येण्यापेक्षा बोलावल्यावर यावं
थोडसं मागतात लोक तर भरभरुन द्यावं
एवढी काय अडचण आहे ?
सगळं तुझ्यापाशीच तर आहे ?”

नशीब म्हणालं..

“अरे काय सांगू यार तुम्हाला कळणारंच नाही !
ते एक सिक्रेट आहे थोडं..
माझी होते बोंब आणि
तुम्हाला पडतं कोडं !
देव नेहमीच मला लिमिटेड स्टॉक देतो
कमीत कमी रिसोर्सेस मध्ये जास्त आऊटपुट घेतो.
ज्याच्या जितकं नावे त्याला तितकंच द्यावं लागतं
कमी जास्तं झालं तर मला स्वत:ला भरावं लागतं.
इटस माय जॉब बाबा ..
मीच जर नशीब आहे तर बोल कोणाला लावू !
माझी तक्रार घेवून काय देवाकडे जावू ?
माझ्या सर्व्हिसच्या करारात त्याची सोय नाही,

त्यात लिहिलंय..

‘जेवढं वाटायला दिलं जाइल तेवढं आणि तितकच वाटायचं
कोणतेही प्रश्न विचारायचे नाहीत तक्रारी करायच्या नाहीत.
भरपूर पगार आहे पण सुट्टी-रजा कधीच नाही.
सर्वात मोठा बोनस म्हणजे तुला कधीही मरण,रिटायरमेंट नाही.’

आता तूच सांग मित्रा मी काय करायचं ?
एकट्यानी कुठे कुठे लक्ष ठेवायचं ?
तुमचं बरं आहे..
जेवढं मिळतं तेवढं जगता
जे दिसतंय तेवढंच बघता.
काहि मिळालं नाही तर मला शिव्या घालून मोकळे होता.
दमून भागून पिचून गेलोय
देव ,दानव, मानव व्हावं;
पण नशीब होवू नये ! “

Monday, August 07, 2006

पुस्तकनिष्ठांची मांदियाळी

अकिराने मला ह्या खेळात सामील करुन घेतले. खेळाविषयी अधिक माहितीकरिता
http://marathisahitya.blogspot.com/2006/05/blog-post.html

१.सध्या वाचनात असलेले/शेवटचे वाचलेले वा विकत घेतलेले मराठी पुस्तक
~ ‘इडली ऑर्किड आणि मी’ – विठ्ठ्ल व्यंकटेश कामत

२. वाचले असल्यास त्याबद्द्ल थोडी माहिती.

~ पुस्तक खूप छान आहे. एक ध्येयाने झपाटलेला हॉटेल व्यावसायिक सतत अविरत कष्ट,जिद्द,सखोल निरिक्षण आणि आई-वडिलांनी केलेले उत्तम संस्कार ह्यांच्या बळावर किती उत्तुंग शिखर पादाक्रांत करु शकतो ह्याची एक चांगली सत्य आणि प्रेरक कथा आहे. अतिशय प्रामाणिकपणे आणि कुठेही अहंमन्यता न उतरवता लिहिलेलं हे पुस्तक आहे.

३. अतिशय आवडणारी /प्रभाव पाडणारी ५ पुस्तके.

(हे फार अवघड काम आहे मला खरतर ह्या यादीमध्ये खूप नावं लिहायची होती/आहेत पण खेळाचा नियम मोडणार नाही. माझी वेगळी यादी स्वतंत्र प्रकाशित करेन)

~ ‘जावे त्यांच्या देशा’ – पु.ल. देशपांडे
~ ‘वपूर्झा’ – व. पु. काळे
~ ‘जगाच्या पाठिवर’- अपुरे आत्मचरित्र – सुधीर फडके.
~ ‘नेताजी’ – वि.स. वाळिंबे
~ ‘चौघीजणी’ – शांता शेळके

४. अद्याप वाचायची आहेत अशी ५ मराठी पुस्तके
(इथेसुद्धा ५ फार कमी आहेत पण तरिही ..)
~ ‘नटसम्राट’ – वि.वा.शिरवाडकर
~ ‘संभाजी’ – विश्वास पाटिल
~ ‘दुर्दम्य’ – गंगाधर गाडगीळ
~ ‘सहा सोनेरी पाने’ – स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर
~ ‘झुंबर’ – आशा बगे

५. एका प्रिय पुस्तकाविषयी थोडेसे
~ ‘जावे त्यांच्या देशा’ बद्द्ल लिहावं म्हणतो. पु.ल. आपल्या सगळ्यांचं दैवत त्यांची सगळी सगळी पुस्तकं खूप सुंदर आहेतच पण हे जरासं वेगळं आहे. ‘अपूर्वाई’/ ‘पूर्वरंग’ ही प्रवासवर्णनं लिहूनसुद्धा काहि अगदी ठेवणीतल्या सोनेरी आठवणी ह्यात आहेत अगदी काळीज ओतून लिहिलेल्या. सगळं जग फिरुन आल्यावर आणि विविध रंगा-ढंगाचे लोक बघितल्यावरसुद्धा सर्व भेदांच्या पलिकडे ‘माणूसपणा’ ह्या जगाला कसा जगवत ठेवतोय ह्याचा झालेला हा साक्षात्कार आहे असं माझं मत आहे. ‘जावे त्यांच्या..’ मधील चार्ली चॅप्लिनचे व्हेनिसच्या चौकातले दर्शन, अंगावर आणि मनात रोमांच उभे करणारी ‘निळाई’ , महायुद्धाच्या राखेतून वर येणारा जर्मनी हे सगळे फार अद्भुत आहे, आपल्याला अंतर्मुख करणारे आहे. मी हे पुस्तक कितीही वेळा वाचू शकतो दरवेळी नवं काहितरी गवसतं

ह्या खेळात सहभागी व्हायला मी ह्यांना निमंत्रित करतो
- सोनाली
- मुक्या
- मिलिंद भांडारकर
- वेदश्री

Friday, June 16, 2006

नि:शब्द

सध्या संध्याकाळी/रात्री मला जशी सवड मिळेल तसा आणि जमेल तेव्हा कधीकधी मी पर्वतीवर जातोय. वर चढल्यावर मागे चालत जावून एक कट्टा आहे त्यावर बसतो. बहुतेक वेळेला एकटा नाहितर मित्र बरोबर असतो. त्या कट्ट्यावर बसून मी शांतपणे समोर दिसणारं पुणं,त्यातल्या ओळखीच्या इमारती,भाग आणि अगणित लुकलुकणारे रंगीत दिवे बघतो. मनात चाललेला विचारांचा, भावनांचा कोलाहल ते सर्व पाहत असतांना आधी आधी डोकं वर काढायचा, माणूस एकटा असला की हे असं आपोआपच होत असावं बहुधा; आपल्याला मनात सलणारे विषय, असणाऱ्या चिंता,भविष्याचा वेध , सभोवताली असलेले अनेक प्रश्न आणि त्याची कुठेही दृष्टीपथात न दिसणारी अगम्य उत्तरं,
‘तत: किम ?’ (पुढे काय) हा तर आपणा समस्त मानवजातीला पडलेला प्रश्न,
आणि ही वाट ज्यानी सोपी करावी अशी आपणा माणसांची अपेक्षा असते ‘त्या’ च्याशी माझा चालू असलेला काहिसा जुजबीच संवाद म्हटलं तर अबोलाच ; तर सांगायचा मुद्दा हा की असं सगळं डोकं वर काढायचं. मग समोर पसरलेलं पुणं बघितलं की हळूहळू सगळं शांत होवू लागायचं त्यातल्या हजारो लाखो लोकांची वर्दळ जगण्याची धडपड असा विचार सुरु झाला मग त्यांना पडलेले प्रश्न आणि अडचणी आणि त्यांच असलेलं वेगळं आणि प्रसंगी विराट स्वरुप ह्यांचापण विचार डोक्यात येवू लागला. इतकं सगळं असतांना मी माझेच विचार का कुरवाळत बसलोय इतर अनेकांच्यापेक्षा मी खरंच खूप सुखी आहे आणि समाधानीसुद्धा ह्याचं भान मला आपोआप आलं. माझ्या आतमधल्या मूळच्याच ऑप्टिमिझम (आशावाद) ला बळकटी येत असल्याचं जाणवलं आणि माझ्याशी एक शब्दही न बोलता मलाच स्वत:शी बोलायला लावून ‘त्या’ ने माझ्या अबोल्यातली हवा काढून घेतल्याचंसुद्धा एक आदरमिश्रित कौतुक वाटलं. बहुधा ह्यालाच ‘ध्यान’ म्हणत असावेत. आताशा मी त्या कट्ट्यावर नि:शब्दच बसतो.