Tuesday, April 11, 2006

पाखराचे गर्वहरण !

पाखरु होवून उडावं
ऊंच झाडावर बसावं
भराऱ्या घेत नाचावं
वाऱ्यासंगे गाणं गावं
हळूच खाली पाहावं
उडण्यासाठी आसूसलेल्या
असहाय्य माणसांवर हसावं.

हो! हसायलाच पाहिजे
त्यांची जागा त्यांना दिसायलाच पाहिजे.
माणूस म्हणजे नेमकं काय ?
दोन हात अन दोन पाय !
उडण्यासाठी त्यांना पंखच नाहित
माझ्यासारखे त्यांना रंगच नाहित
सगळे म्हणतात माणूस म्हणजे
शक्तिमान,बुद्धिमान.
बेभान वाहणाऱ्या वाऱ्यामध्ये
जे उडू शकत नाहित
ते कसले शक्तिमान ?

दूर त्या डोंगरावर एक माणूस उभा आहे
त्याला आता हसायलाच पाहिजे
त्याचा कमीपणा दिसायलाच पाहिजे
हा घेतला प्रचंड वेग हा मारला सूर!

अरेरे! हा कसला आवाज ? हा कसला धूर ?
त्याच्या हातात कोणते यंत्र ?
त्यातून निघाले कोणते अस्त्र ?
अरेरे ! घात झाला घाव मोठा वर्मी लागला.
आता उडता येत नाही
आता जगता येत नाही
माणसाला कमी लेखून त्याच्यावर मी हसलो
आणि इथेच मी फसलो.